मुंबई : नथुराम गोडसे साकारल्यामुळे अमोल कोल्हे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी 'वाय आय किल्ड गांधी'  (why i killed gandhi)या चित्रपटात साकारलेली नथुराम गोडसे यांची भूमिका या वादाचा मुळ मुद्दा ठरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडून घरचा आहेर देण्यात आला आहे. 


अमोल कोल्हे यांना आव्हाड यांचा घरचा आहेर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


“अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही,” अशा शब्दांमध्ये आव्हाड यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. 


तसेच पुढे म्हणाले की “विनय आपटे, शरद पोंक्षे यांना या भूमिकेबद्दल महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेने प्रचंड विरोध केला त्यामुळे त्याच भूमिकेबरोबर राहून या गांधी विरोधी चित्रपटाला विरोध करणार,” असंही आव्हाड म्हणाले आहेत.


आव्हाडांच्या भूमिकेबाबत कोणतंही वैषम्य नाही, अमोल कोल्हे यांचं उत्तर 


जितेंद्र आव्हाडांची भूमिका रास्त आहे.  मी त्यांना कल्पनाही दिली की, सदर गोष्ट 2017 मध्ये घडली. कलाकारांच्या आयुष्यातील आव्हानं त्यावेळची गोष्ट समजून घेतली तर आव्हानं कळतील. २०१७ साली या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. ज्यावेळी कोणत्याही सक्रिय राजकारणात नसताना मी ही भूमिका साकारली होती.


एखादी भूमिका करतो म्हणजे त्या विचारधारेसोबत सहमत असतो असे कलाकार म्हणून कधीच नसते. काही विचारांसोबत आपण सहमत असतो. तर काही विचारधारांसोबत सहमत नसतानाही आपण ती भूमिका करतो.


माझ्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यातसुद्धा नथुराम गोडसेचे उदात्तीकरणाच्या संदर्भात मी कधीही भूमिका घेतलेली नाही. केवळ एक कलाकार म्हणून भूमिका साकारणे आणि त्याचा राजकीय विचारांसोबत संबंध जोडला जाणे या दोन विभिन्न गोष्टी आहेत, असे अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


 


बाळासाहेब थोरात यांची अमोल कोल्हे यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया 


कलाकार हा कलाकार असतो.  यात एक अपेक्षा आहे यातून नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरण होऊ नये.  कलाकाराला बंधन असू नये. मला खात्री आहे उदात्तीकरण करणारी भूमिका कुणी घेणार नाही.  ज्या नेतृत्वामुळे देशाला स्वातंत्र्य मिळालं, त्यांच्या विचारामुळे देश प्रगती करतो आहे, त्याच्या विरोधात भूमिका घेतली नसेल अशी अपेक्षा आहे.